मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. याला अनेक पक्षांनी, संघटनानी पाठिंबा दिला आहे. नारायण राणेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का? याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी आणि राणे यांच्या भेटीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. या भेटीत जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या भेटीचा परिणाम नेमका काय होतो हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

येत्या १५ ऑगस्टला आम्ही जागोजागी गावसभा घेणार आहोत. यामध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करता यावं अशी मागणी केली जाणार आहे. यामध्ये नारायण राणे सुद्धा सहभागी होणार आहेत, असे शेट्टी म्हणाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावं. ईव्हीएममध्ये छेडछाड फक्त ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच करू शकतात, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही दोन वेळेस भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आघाडी आणि युतीशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचाही पर्याय मतदारांना उपलब्ध होऊ शकतो.

महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन करायाचा असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाने मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं. मतदारांमध्ये सुद्धा शंका आहे, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या जागाबद्दल अजून कोणतेही चर्चा झालेली नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते आम्ही २२० जागा जिंकू, २५८ जागा जिंकू, असे खुलेआम बोलत आहेत. जर ईव्हीएमद्वारे जर सत्ताधारी पक्ष या जागा जिंकत असतील तर उरलेल्या जागाबद्दल आम्ही विचार करू, असा टोला शेट्टी यांनी यावेळी लगावला.

राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीची चर्चा?