7 May 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुख्यमंत्र्यांनी लावलेला हाऊसफुल्ल बोर्ड हटवून हे भाजप नेते पुन्हा भरती सुरु करणार

MLA Prasad Lad, MP Raosaheb Danave, Devendra Fadnvis, NCP, Congress

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वाटेवर असताना कोकणातील दोन-तीन आमदार भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांना जनसमुदायात मान्यता आहे, अशा लोकप्रतिनिधींनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच रंगणार, याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती एनसीपीची झालेली आहे, असे म्हणत त्यांनी एनसीपीवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्षातील निम्मे आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा करत विरोधी पक्षाचे ८२ आमदार धरले, तर ४० आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला. ‘संपर्कात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे, मात्र पक्षात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री घेणार आहेत’, असे ते म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती कायम राहील, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र सामाजिक समीकरण आणि राजकिय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षात होत इनकमिंग असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही.पक्षात कुणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरूच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच तुम्हाला न्याय मिळत असतो, असा कानमंत्र दानवेंनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या भारतीय जनता पक्षामध्ये भरती बंद झाली असून हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे असं विधान केलं होतं. मात्र सध्या या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची विधानं पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केवळ मारून घेण्यासाठी ते विधान केलं होतं का, अशी चर्चा रंगली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या