11 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर

Maharashtra Assembly Election 2019, Devendra Fadnvis, Shivsena, NCP, Uddhav Thackeray

मुंबई : लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती ‘पक्की’ असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या गोटातून करण्यात येत आहे. पण शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींचे म्हणणे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध विजयी झालेल्या आमदारांना भारतीय जनता पक्षामध्ये ज्या तत्परतेने सामील करून घेतले जात आहे, ते बघता भारतीय जनता पक्षा-शिवसेनेच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह उमटले आहे. २०१४ प्रमाणे यंदा देखील भारतीय जनता पक्षाकडून शेवटच्या क्षणी शिवसेनेशी दगाफटका होण्याचा संशय नवनिर्वाचित शिवसेना खासदारांच्या मनात बळावत चालला आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये भरती झालेले एनसीपीचे बहुतांश आमदार शिवसेनेविरुद्ध निवडून आल्याचे निदर्शनाला आणून देत युतीच्या शक्यतेविषयी ते संशय व्यक्त करीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जोरावर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. जिथे भारतीय जनता पक्षाची ताकद कमी पडली, त्या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले, याची जाणीव भारतीय जनता पक्षाचे नेते करून देत आहेत.

थोडक्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वतःच्या बळाऐवजी भारतीय जनता पक्षामुळेच निवडून आली, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पूर्ण बहुमतासाठी शिवसेनेचा विजय भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आवश्यक होता; पण आता विधानसभा निवडणुकीत आपल्या जीवावर शिवसेनेची चांदी करून देण्याच्या मनःस्थितीत भारतीय जनता पक्षा नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान ‘एकदाची युती तोडा, हीच संधी आहे, स्वबळावर लढा’ असा दबाव जिल्ह्या- जिल्ह्यांमधून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावर येत आहे. मात्र, आपल्याला युती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार, असे नेतृत्वाकडून सांगितले जात असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

युती तोडण्याबाबत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातून अधिक दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात युतीवरून अस्वस्थता दिसत आहे. शहरातील सर्व ६ मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. तिथे शिवसेनेला एकही जागा द्यायला स्थानिक नेते तयार नसल्याचे सांगण्यात येते. अशीच परिस्थिती नागपूर ग्रामीणमध्ये आहे. सावनेरवगळता सगळीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. शिवसेनेला एकही जागा दिली तरी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारास घरी बसावे लागेल. युतीत १४४ जागा घेण्याऐवजी रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप, सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन २८८ जागा लढवाव्यात, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

दरम्यान तसेच चित्र नाशिक, पुणे या शहरांमध्ये आहे. सर्व जागा भारतीय जनता पक्षाकडे असताना शिवसेनेला जागा देऊन आमदारांना घरी बसवणार का, असा कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांचा सवाल आहे. आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही; पण नेत्यांच्या गाठीभेटी होतात तेव्हा त्यांना युती करू नका, असेच सांगत आहोत, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे उत्साहात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वबळावरच निवडणूक लढावी असे वाटते. सोलापूर, सांगली, लातूर, अहमदनगरमध्येही स्थानिक नेत्यांचा स्वबळाचा सूर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना सांगितले की, युती तोडण्याचा दबाव नाही पण भावना आहेत. स्वबळावर लढलो तरी सत्ता येईल, असे काही जण सांगतात, पण हा सूर सार्वत्रिक नाही. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणाले की, स्वबळावर लढावे, असा आग्रह मुंबईतही आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र लोकांनाच हवे असल्याचे कार्यकर्ते म्हणवतात. सेनेला सोबत घेतले तर पुन्हा त्रास सहन करावा लागेल, अशी भावना आहे. सेनेचे आमदार, मंत्री मागताहेत महाजनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ती आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

युतीचा अंदाज येत नसल्याने आघाडीचे आमदार थांबले काँग्रेस, एनसीपीतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या ७५ टक्के आमदारांचा कल हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा आहे; पण त्यांच्यापैकी काहींचे मतदारसंघ पूर्वीचे शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. भाजपने ती जागा शिवसेनेकडून स्वत:च्या कोट्यात घ्यावी; कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाकडूनच लढायचे आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे. तसे होत नाही तोवर पक्षांतराचा निर्णय त्यांनी रोखून धरला आहे.

दरम्यान पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये कलगितुरा रंगला आहे. तर दुसरीकडे युती होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाची मंडळी करीत असली तरी मागचा अनुभव लक्षात घेता सावध झालेल्या शिवसेनेने यावेळी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x